बांबूच्या गुढ्या ऊभारायची खरंच गरज आहे का? बांबू तोडण्यापेक्षा लावण्याची आज गरज असताना आपण फक्त शास्त्राला हवं म्हणून करतो. काय गरज आहे या सगळ्याची? त्या पेक्षा कडुलिंबाची चार झाडं जगवीन, मी बांबू लावून जगवीन, हा विचार का नाही येत मनात?
उद्या गुढीपाडवा! प्रथेनुसार बऱ्याच गोष्टी आम्ही पार पाडणार आणि धन्य होणार. त्यानिमित्ताने तर्कशुद्ध असे काही… खरं तर जो जिवंत आहे, जो धारण करता येतो तो धर्म. नुसती कर्मकांडं करून धर्माचं जतन ही भूलच. त्या अर्थाने हिंदूधर्म हा कर्मकांडापुरताच ऊरलाय, म्हणूनच तो जिवंत धर्म नाही. इतरही धर्म याच चक्रात अडकलेत. तेही मृतच. यामुळेच भविष्यात ते कोलमडतील यात शंकाच नाही. पण हे करणार कोण? धर्माचं जिवंत स्वरूप (मातीही जिवंत होऊ शकते तर धर्म का नाही होणार?) काही करायचं तर सखोल विचार हवा. मनन हवं, चिंतन हवं. नुसत्या ज्ञानेश्वरीची पारायणं ऊदंड केली वारकऱ्यांनी, पण समाज चाललाच की रसातळाला, कारण पुन्हा कर्मकांडच, विचार ना मनात ऊतरला ना जनात. “एकतरी ओवी अनुभवावी” हे राहिलं फक्त पोथ्या वाचणाऱ्या क्षणापुरतं. बाकी जग काय म्हणेल? असं कसं करू? यातच बायकांची, नि पोथ्या वाचणाऱ्यांची, आयुष्य गेली.
आपण परंपरा बदलतो का? नाही. पुराणकाळातील सर्व तसेच ठेवून समाज कधीच बदलणं शक्य नाही. नवनवीन गोष्टी आत्मसात करून जतन करायला हव्यात. ऊदाहरणच घ्यायचं, तर बांबूच्या गुढ्या ऊभारायची खरंच गरज आहे का? बांबू तोडण्यापेक्षा लावण्याची आज गरज असताना आपण फक्त शास्त्राला हवं म्हणून करतो. काय गरज आहे या सगळ्याची? त्या पेक्षा कडुलिंबाची चार झाडं जगवीन, मी बांबू लावून जगवीन, हा विचार का नाही येत मनात? जग काहीही केलं तरी बोलणारच मग का ऐकायचं जगाचं? मनातून वाटलं तर तर्क करून त्यामागची भूमिका लक्षात घेऊन करायला हवं ना, पण… निसर्गात सध्या लालसर तांबूस पानाच्या गुढ्या ऊभारल्यात. त्या बघायला बाहेर पडायचं सोडून घरात कसली गुढी ऊभारायची त्यात नको असलेल्या साखरेच्या गाठी घालायच्या? हा गाठी नावाचा पदार्थ जिने शोधला ती बाई आळशीच, गोडघाशी असणार. पण म्हणून आपण ते का पाळायचं? त्यात बुध्दीचा काही विचार?
धर्माला हात लावला की भावना कशा दुखावतात? निर्विकार मन करायला शिकवलं ना तुम्हाला गीतेनं, मग दुखतात कशा भावना? हा तर फक्त अहंकार. तो दुखावला जातो. (मला नेहमी वाटतं की मी एकच शोध लावीन, तो म्हणजे अहंकारावरची लस). मी मोठा, माझा धर्म मोठा, असं जेव्हा प्रत्येक धर्मीयाला वाटायला लागतं तेंव्हाच त्याच्या नाशाची बीजं पेरली जातात. आज हवाय निसर्ग धर्म. जगा, जागा – म्हणजे जागृत व्हा – आणि जगू द्या असं म्हणणारा. सूक्ष्म जीवाणूंपासून महाकाय हत्तींपर्यंत सर्वांना सामावून घेणाऱ्या निसर्ग धर्माची आज खरी गरज आहे. ते समजून सांगणारे आज मोठे ठरतील. त्याप्रमाणे वागणारेच जगात टिकतील. बाकीच्यांचे शंभर पापांचे घडे कधीच भरलेत, ओसंडून वाहताहेत. निसर्ग घेईल बघून त्यांच्याकडे, त्यांचा मृत्यू अटळ आहे. कोणत्याही बेसावध क्षणी येणारच आहे. कधी ते त्यांनाही कळणार नाही कारण ते आधीच मृत आहेत.
आपण निसर्गाला समजावून घेतलं तर सर्वात ऊत्कृष्ट गुरू निसर्गच. तो सोडून आपण इतर गुरूंची कास धरली तर संपलच. तेव्हा वसंत ऋतूत या पालवीला पाहूयात. नवी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी घेऊयात. त्याची काळजी आपापल्यापुरती जरी घेतली तरी तो शंभर पटीनी आपली काळजी घेईल. आपण देऊया काहीतरी त्याला त्याच्याकडून अपेक्षाही न करता. हेच शिकवलयं ना सारं गीतेत? उपनिषदात वेगळं काहीच नाहीए. त्यालाच देऊन नामानिराळे रहायचा प्रयत्न तर करूयात. मी मी हवयं कशाला? मी नाही ते ऊत्तम! माझ्या हातून करवून घेतलं गेलं, ही भाषा हवी. मी–पणा कसा गळून पडतो बघाल. शोधायलाच लागेल हा मी!
तर माझा धर्म कोणता याचं प्रत्येकाला उत्तर हवयं. निसर्ग हे खरं तर उत्तर आहेच, पण विसरलोय आपण या वेगवान युगात. तेंव्हा जरा विसावू या वळणावर, बघायला शिकू या वळणावर. तेंव्हा आणि तेंव्हाच आपण स्व–धर्म शिकतोय याचं समाधान वाटायला लागेल. मग वेगळे सणवार करायची गरजच नसेल. रोजच सण साजरा करू आपण. पटलं तर हो म्हणा नाही तर राहिलं!
डॉ. वृंदा कार्येकर
संपूर्ण स्वास्थ्य सल्लागार
kvvrunda@gmail.com